धामंत्री येथील प्रसिध्द नागेश्र्वर ज्योतीर्लिंग महादेव मदींरात, शिव महापुराण कथेचे आयोजन, शुक्रवारी (ता.९) निघणार कलश यात्रा, तर अवीनाश महाराज कडु करणार कथा वाचन.
मंदिराची थोडक्यात माहिती, ४११ किलो वजनाची घंटा असलेले विदर्भातील एकमेव हेमाडपंथी मंदिर

आर्वी,दि.७:- विदर्भाची वरदायीनी वर्धा नदीच्या तिरावर विराजमान धामंत्री येथील प्राचीन नागेश्र्वर र्ज्यातीर्लिंग महादेव मंदीरात महाशिवरात्री निमीत्त शुक्रवार (ता.९) पासुन महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याची सुरूवात शुक्रवारी (ता.९) कलश यात्रेने व रासेगाव येथील अवीनाश महाराज कडू यांच्या मधुर वाणीतुन करण्यात येणाऱ्या कथावाचनाने होणार आहे.
वर्धा नदी तिरावर वसलेल्या धामंत्री येथे असलेले इतीहास कालीन हे महादेव मंदिर विविध वैशिष्ठ पुर्ण कारणाने प्रसिध्द आहे. पुरातन काळातील चार टन वजनाची घंटा असलेले विदर्भातील हे एकमेव मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी महा शिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. याचे सात्यत कायम ठेवत शुक्रवारी (ता.९) सकाळी आठ वाजता धमंत्री नगरी मध्ये कलश पुजन व पालखी पुजन करण्यात येणार असुन विदर्भाची गंगा म्हणुन नावाजलेल्या वर्धा नदीच्या पात्रातुन जल भरुन मंदिरातील शंभु महादेवाच्या शिवलींगावर ते अर्पण करण्यात येणार आहे. या नंतर दुपारी एक वाजता कथा वाचनाला सुरूवात होईल सायंकाळ पाच वाजता याचे समारोप होणार असुन हे कथावाचन गुरूवार (ता.१५) पर्यंत सातत्याने सुरू राहणार आहे. या महोत्सवाचे समारोप शुक्रवारी (ता.१६) ह.भ.प. अविनाश महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे.
महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर होण्याऱ्या या महोत्सवात परिसरातील भावीक भक्तांनी सहभागी होवुन शिवदर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष कैलाशकुमार पनपालीया तथा सदस्य विजय करडे, मोहन इंगळे, रवींद्र भोयर, धीरज चांडक, सुनिल मारबदे, रमेश राउत, सहकारी मनोहर कसर, जानरावजी भारस्कर, रामुकाका बावने यांनी केले आहे.
मंदिराची थोडक्यात माहिती

त्रेतायुगापासुन एक प्राचीन मंदिर असल्याचे पुरावे येथे मिळतात. राजा भीमकजी कौंडण्यपूर शास्त्रामध्ये कुंडीनपुर नावाने प्रसिद्ध होते. राजा भीमकजी आपली कन्या रुख्मिणीला घेऊन भुयारी मार्गाने या मंदिरात येत होते. येथे ऋषि वशिष्ठ यांनी तपस्या केली होती, ही तपोभुमी आहे. या परीसरामध्ये प्राचीन मुर्त्या आहे. येथे मोठ मोठे तपस्वी तपस्या करुन गेले, असे हे पवित्र मंदिर आहे.
श्री नागेश्वर महादेव संस्थान धामंत्री हे गाव कुऱ्हा ते कौडण्यपूर रोड वर मार्डा( जहागिरपूर) फाट्यावरून ८ कि.मी. उत्तरेस तसेच नागपूर महामार्गावरून तिवसा जवळील वरखेड मार्गे ६ किमी आहे. अत्यंत प्राचीन व भगवत गीतेमध्ये उल्लेख असलेले आणि पौराणिक काळात धामंत्री म्हणुन उल्लेखित महादेवाचे शिवलिंग असलेले एक हेमाडपंथी स्वरुपात खरपाच्या दगडात बांधकाम केलेले हे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर त्रिवेणी संगम असलेल्या वर्धा नदीच्या काठावर असुन जुन्या काळात कैलास टेकडी धामंत्री म्हणुन ओळखले जाणाऱ्या उंच जागी उभे आहे. अत्यंत कोरीव स्वरुपात नक्षीकाम केलेले वेगवेगळ्या साधुसंताच्या मुर्त्यांनी पाषाणांमध्ये कलाकृतीने परिपुर्ण असे हे मंदिर आहे. प्राचीन काळामध्ये येथे कोणतीही वाहतुक व्यवस्था नसतांनाही लाखोच्या संख्येने भक्त दर्शनाकरिता यायचे. येथे अनंत काळा पासुन महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. राज्या महाराजांच्या काळात या मंदिराचा जिर्णोद्धार झालेला आहे. येथील शिवलिंग हे स्वयंभु असुन मोठे आणि भव्य आहे. मंदिराचा गाभारा हा काळ्या दगडाने बनविलेला असुन समोरील सभा मंडप हा खरपा मध्ये व कलाकृतीमध्ये दगडाच्या खांबावर नक्षीकामाने तयार केलेला आहे. प्राचीन काळात कोणतीही वाहतुक व्यवस्था उपलब्ध नसताना अशा प्रकारे घडविलेले हे मंदिर रहस्यमय आहे.
१९ व्या शतकात येथे एका भक्तांने झालेल्या इच्छापुर्तीची अनुभूती म्हणुन एक ४११ किलो वजनाची महाघंटा दान केली होती. अष्ट धातु मध्ये बनविल्या गेलेल्या या महाघंटेचा नादसुमारे आठ किलोमीटर परिसरामध्ये गुंजतो. या करीता विशिष्ठ घंटागृह बांधण्यात आले आहे. वर घंटा, मध्य भागात नंदी आणि खाली आणखी एक भव्य शिवलिंग अशा तीन टप्प्यांमध्ये या घंटा घराचे बांधकाम झालेले आहे.
येथे वाराणसी (इलाहाबाद) वरून साधुसंत फार पुर्वीपासुन तपस्या करण्याकरिता आणि मंदिराला भेटी देण्याकरिता येतात. मंदिर संस्थाना तर्फे अशा साधु संताची व्यवस्था केल्या जाते, ही या मंदिराची पुर्वीपासुनची परंपरा आहे. मंदिरामध्ये गेल्या नंतरच येथील उर्जेची प्रचिती होते. या मंदिराचा परिसर हा फार मोठा आणि व्याप्त आहे. मंदिराला पाहताच या मंदिराचे पुरातन अस्तित्व लक्षात येते. अत्यंत रमनिय हा परिसर आहे आणि बाजुला घनदाट जंगल आणि नदी प्रवाह असा सभोवतालचा परिसर आहे. मागील सहा वर्षापासुन या मंदिराचा झपाट्याने विकास सुरु आहे. भक्तांकरिता राहण्याच्या व्यवस्थेसह, आवश्यक सोयी सवलती उपलब्ध करुन देण्यात येतात. या मंदिराचे चैतन्य घेण्यासाठी सर्वांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन विश्वस्तांनी केले आहे.


