आता तर बिबट शिरु लागले गावात, नागरिकांमध्ये निर्माण झाली दहशत. पिंपळखुटा गावाच्या मध्यभागी शिरुन, बिबट्याने केली कालवडीची शिकार. वन विभाग वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करणार काय? नागरिकांचा प्रश्न.

आर्वी,दि.२८:- सारंगपुरी-इंद्राजी वन परिसरात वावरणाऱ्या प्राण्यांनी शिकारी करीता गावाचे रुख धरले असुन रवीवारी (ता.२८) भल्या पहाटे खुंखार बिबट पिंपळखुटा गावात शिरला आणी चार वर्षाच्या कालवडीची शिकार करुन राजरोस पणे निघुन गेला. यामुळे नागरिकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली असुन वन विभाग वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करतील काय? असा त्यांचा प्रश्न आहे.
पिंपळखुटा येथील शेतकरी भास्कर खेरडे यांचा गावाच्या मध्यभागी गोठा असुन यात चार वर्षाची कालवड बांधुन ठेवली होती. रवीवारी (ता.२८) ते सकाळी उठले आणी गोठ्याकडे गेले तर, त्यांना कालवड रक्ताच्या थारोळ्यात मरुन पडलेली दिसली. वन विभागाला याची माहिती देताच राऊड ऑफीसर जामकर, वन रक्षक कदम, घसाड आदि घटना स्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा करुन पुढील कारवाई सुरू केली आहे.
तालुक्यातील चिंचोली (डांगे), पाचोड (ठा.) हर्रासी, हिवरा, जामखुटा, वाढोणा, पिंपळखुटा आदि गावांना सारंगपुरी व इंद्राजी वन परिसराचा विळखा आहे. या वन क्षेत्रात वन्य प्राण्यांसोबतच बिबट सारख्या हिस्त्र प्राण्याचा सुध्दा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. आधी ते जगंलातच शिकार करायचे आता मात्र त्यांची हिम्मत वाढली असुन गावात सुध्दा शिरु लागल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेती कशी करायची, हिस्त्र प्राण्यांन पासुन पाळीव प्राण्यांचे व स्वत:च्या परिवाराचे रक्षण कसे करायचे? शेत जमीन वनपरिक्षेत्राला लागुन असल्यामुळे शेत कस कसायच? आदी मोठे बिकट प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाले असुन वन अधिकाऱ्यांनी याचा बंदोबस्त करावा अशी परिसरातील नागरिकांची मागणीआहे.