महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभागाचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, आर्वी शहराला दुषित पाण्याचा पुरवठा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात, तक्रार देवुन सुध्दा नगराध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे
तक्रार देवुन दहा दिवस झाले मात्र सुधारण नाही.नगराध्यक्ष व उपाध्यक्षांनी घेतली नाही दखल. लगेच घेतली दखल- उपाध्यक्ष गौरव जाजु. अशुध्द पाणी येणाऱ्या परिसराची माहिती द्या-अभियंता गोरलवार.

आर्वी,दि.३:- शहराला महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभागाच्या माध्यमातुन पाणी पुरवठा केल्या जातो मात्र गत अनेक दिवसा पासुन दुषीत पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याची तक्रार करुन सुध्दा कोणतीच सुधारणा करण्यात आली नाही. शिवाय नगराध्यक्ष व उपाध्यक्षांनी सुध्दा याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.
शहराला दुषीत पाण्यापासुन मुक्ती मिळावी याकरीता महाराष्ट्र शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करुन वाढवी पाणी पुरवठा योजना व जल शुध्दीकरण केंद्रांची निर्मीती केली. शहराला शुध्द पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जिवन प्राधीकरणावर सोपवीली. मात्र ते आपली जबाबदारी योग्य पध्दतीने राबवीत नसल्याने शहरात दुषीत पाण्याचा पुरवठा होत असुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी नागरिकांमध्ये तिव्र नाराजी निर्माण झाली आहे.

नागरिकांना नाइलाजास्तव दैनंदिन वापरासाठी आणि पिण्यासाठी बाहेरून वॉटर एटीएम किंवा बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागत आहे. यामुळे आधीच महागाईने होरपळत असलेल्या सामान्य नागरिकांना मोठ्या आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागत आहे. तर, दुसरीकडे, अशा दूषित आणि आरोग्याला घातक ठरणाऱ्या पाण्याच्या वापरामुळे परिसरात साथीचे आजार पसरण्याचा मोठा धोकाही निर्माण झाला आहे. हे दूषित पाणी पिण्यात आल्यास लहान मुलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना उलट्या, तीव्र जुलाब, गॅस्ट्रो, कॉलरा आणि तीव्र पोटदुखी यांसारख्या पोटाच्या गंभीर विकारांचा सामना करावा लागू शकतो. तसेच दूषित पाण्यातील जंतूंमुळे घसा दुखी, घशाचा संसर्ग आणि टायफॉइडसारखे जलजन्य आजार उद्भवण्याचीही दाट शक्यता निर्माण झाली आहे.

तक्रार देवुन दहा दिवस झाले मात्र सुधारण नाही
वर्धा नदी व सांरगपुरी तलावामधुन उचल करुन जाजुवाडी येथील जल शुध्दीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रीयाकरुन शुध्द पाण्याचा पुरवठा व्हावा अशी अपेक्षा आहे मात्र अवलोकन केले असता जल शुध्दीकरण केंद्रातच अस्वच्छता आहे. शिवाय जास्त लाभ मिळवीण्याच्या दृष्टीने योग्य प्रमाणात ब्लिचींग पाऊडरचा वापर होत नसल्याने गढुळ व घाण युक्त पाण्याचा पुरवठा होतो. यातच ठिकठिकाणी लिकेज असुन नादुरस्त व्हॉलची भर पडलेली आहे. याची तक्रार करुन दहा दिवसाचे वर झाले मात्र सुधारणा झाली नाही.
नगराध्यक्ष व उपाध्यक्षांनी घेतली नाही दखल
शहराच्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदार प्रामुख्याने नगर परिषद प्रशासनावर आहे आणी प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याकरीता नगराध्यक्ष उपाध्यक्ष आदिंची निवड केली आहे. २५ मे ला याची तक्रार नगर परिषदेकडे केली. मात्र, नगराध्यक्ष व उपाध्यक्षानी सुध्दा याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.
लगेच घेतली दखल- उपाध्यक्ष गौरव जाजु
तक्रार प्राप्त होताच पाणी पुरवठा सभापती अजय कटकमवार व मी तातडीने दखल घेवुन महाराष्ट्र जिवन प्राधीकरण अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला व व्हॉटस् अपच्या माध्यमातुन संदेश पाठवुन माहिती सुध्दा दिली. अनेक ठिकाणचे लिकेज दुरस्त करुन घेतले आहे. याशिवाय आज पर्यंत अधिकाऱ्यांच्या संपर्कात असुन सुरळीत शुध्द पाणी पुरवठा व्हावा याला आमचं प्रथम प्राधान्य आहे. असं उपाध्यक्ष गौरव जाजु यांनी सांगीतले.
अशुध्द पाणी येणाऱ्या परिसराची माहिती द्या-अभियंता गोरलवार
उपाध्यक्ष गौरव जाजु यांचे सोबत भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधला असता त्यांनी जि. प्रा. विभागाचे अभियंता गोरलवार यांना थेट लाईनवर घेवुन त्यांच्यासोबत संभाषण घडवुन आणले. यावेळी त्यांनी ज्या परिसरात गढुळ पाणी येत असेल त्या भागाची आम्हाला माहिती द्या. शोध घेवुन लगेच दुरस्त करण्यात येईल असे सांगीतले.