आंदोलन

स्पर्धा परीक्षेतील कथित गैरव्यवहार व स्पर्धा परीक्षेतील त्रुटी तसेच विद्यार्थी-युवकांच्या प्रश्नांकडे सतत दुर्लक्ष करणाऱ्यावर तात्काळ कार्यवाही करा. युवा नेते अजिंक्य अमर काळे यांची आर्वी येथील महाविकास आघाडी तर्फे आयोजित ठिया आंदोलनात मागणी.

आर्वी,दि.२०:- राज्यातील विद्यार्थी व युवकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे होत असलेले दुर्लक्ष, स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, वारंवार होणारे पेपरफुटीचे प्रकार, ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी तसेच पोलीस भरतीतील कथित अन्यायाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी, आर्वी तालुक्याच्या वतीने सोमवारी (ता.२०) येथील शिवाजी चौकात निषेध ठिय्या आंदोलन करण्यात आले.

राज्यातील लाखो विद्यार्थी व युवकांचे भविष्य धोक्यात आले असतानाही सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. स्पर्धा परीक्षांचे वारंवार पेपर फुटणे, भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार आणि ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी सरकार जबाबदारी टाळत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.

विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांसाठी डॉ. सोनम वांगचुक यांनी केलेल्या आंदोलनाकडेही सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. तसेच या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनांनंतरही नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला नसल्याने सरकारची भूमिका विद्यार्थीविरोधी व असंवेदनशील असल्याची भावना समाजात निर्माण झाली असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.

या आंदोलनातून पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या:

  • केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा.
  • ब्लॅकलिस्टेड कंपन्यांशी संबंधित संस्थांना परीक्षा व भरती प्रक्रियेची कामे देऊ नयेत तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेसह (NTA) संबंधित विभागांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक कारवाई करावी.
  • ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करून पारदर्शक, विश्वासार्ह व सुरक्षित परीक्षा प्रणाली लागू करावी.

हे आंदोलन खासदार अमर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी युवा नेते अजिंक्य काळे, आर्वी विधान सभेतील तडफदार व धडाडीचे महिला नेतृत्व सौ. मयुरा ताई काळे यांच्यासह नगर परिषद विरोधी पक्ष नेते प्रा. पंकज वाघमारे, प्रहार सोशल फोरमचे बाळा जगताप, नगर सेवक प्रियंका भीमके, शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख गुड्डू गावंडे, महेश चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) चे राजू रत्नपारखी, गौरव मोहोड, शिल्पा चौहान, शिक्षक संघटनेचे प्रेमराज पालिवाल, राजू पालिवाल, नगरसेवक नितीन लोहे, शीतल मोहोड, अवधूत देवघरे, विजू गहलोत, शोभा कानफाडे, ऋषभ निस्ताने, अमित भुसारी, कैलास जैन, विजय गिरी, शैलेश ठाकूर, छोटू शर्मा तथा महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच आर्वी शहरातील अनेक नागरिकांनी उत्स्फुर्तपणे या निषेध आंदोलनात सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button