‘पंख’ आनंददायी स्वप्नाचे” एक दिवशीय प्रशिक्षण शिबीर संपन्न ९ ग्राम पंचायतीमधील २७ प्रतिनिधींनी घेतला सहभाग

आर्वी,दि.१:- पंचायत राज विभागातील प्रतिनिधींकरीता ‘पंख-आनंददायी स्वप्नाचे’ या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन येथील पंचायत समितीच्या सभागृहात नुकतेच करण्यात आले होते. यात तालुक्याच्या ९ ग्रामपंचायतीचे २७ प्रतिनिधींनी सहभाग घेतला. यात सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक व ग्रामपंचायत अधिकारी यांचा समावेश होता.
या शिबीराचे उद्घाटन गटविकास अधिकारी शिवशंकर इंगोले यांनी केले. विस्तार अधिकारी सौ. गोरे, उमेदचे तालुका व्यवस्थापक हडवे हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते.
विविध कृतींच्या माध्यमातून सहभागींच्या परिचयाने प्रारंभ झालेल्या या शिबीरात ‘पंख’ प्रकल्पाची उद्दिष्टे, अंमलबजावणीची रूपरेषा व बालविकासातील महत्त्वाच्या संकल्पनांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणात सुदृढ नातेसंबंध, ३ ते १२ वर्षे वयोगटातील बालकांचा सर्वांगीण विकास, तसेच सकारात्मक व नकारात्मक अनुभवांचा बालकांच्या आयुष्यावर होणारा परिणाम या विषयांवर खेळ, कृती व गट चर्चेच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला. तर, बालकांसाठी सुरक्षित, संवेदनशील व पोषक वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी पंचायत राज विभागातील प्रतिनिधींची भूमिका, जबाबदाऱ्या व प्रकल्पातील सहभाग यावर विशेष चर्चा झाली. अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, बचत गटांचे सीआरपी व पंचायत राज प्रतिनिधी यांच्या समन्वयातून गावपातळीवर जनजागृती उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले. पालकांपर्यंत प्रकल्पाची माहिती पोहोचविण्यासाठी मासिक बैठका, दवंडी व व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संदेश प्रसारित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पंख – आनंददायी स्वप्नांचे प्रकल्पाच्या वतीने प्रकल्प समन्वयक रीना मारबते, प्रियंका गुप्ता, आशीष मोहरले, कोमल वाघमारे व दीप्ती अगलावे यांनी प्रशिक्षणाचे मार्गदर्शन केले.